Wednesday, 13 February 2013


व्हेज पुलाव

वेळ: ३० मिनेटे
६ जणासाठी


साहित्य: २ वाटी बासमती अख्खां तांदूळ, १/४ कप श्रावणी घेवडा उभा बारीक चिरून, १/२ गाजर चौकोनी आकारात साधारणता १/२ इंच आकारात, तसेच १ ढोबळी मिरची उभी १/२ इंच आकारात चिरून, ५ ते ६ फ्लॉवर चे तुरे चिरून, १ कप मटार, ३ कांदे उभे चिरून, ४ ते ५ हिरव्या मिरच्या, आले १ इंच, ८ लसूण पाकळ्या, प्रत्येकी ४ लवंग, दालचिनी, मिरे, विलायची, २ पाने तमालपत्र, १/२ चमचा जिरे, १ १/२ चमचा काजू पाकळी,  ५ ते ६ मनुके, तेल २ चमचे, मीठ, साखर, साजूक तूप १ ते १/२ चमचा, पाणी ५ ते ६ वाट्या

कृती: सर्व प्रथम तांदूळ धुऊन घेऊन त्याला हिरवी मिरची, आले,लसूण ची एकत्रित पेस्ट १५ मिनिटे लावून ठेवणे, चिरलेल्या प्येकी निम्मा कांदा तेलामधून चांगला लाल कुरकुरीत होईल असा तळून घ्या. त्याच तेलामधून काजूचे तुकडे देखील तळून  काढावे. पातेल्यात २ चमचे तेल टाकून ते गरम झाल्यावर त्यात तमाल पत्र, जिरे, लवंग, दालचिनी, विलायची उघडून अख्खी, काळीमिरी घालावी लगेचच उरलेला सर्व कांदा गुलाबी होवेस्पर्यंत परतावा. आता त्यात ढोबळी मिरची, श्रावण घेवडा, गाजर आणि मटार घालून चांगले परतावे. तेलामध्ये वरील सर्व भाजी थोडी शिजू द्यावी. आता त्यात आल, मिरची लसूणची पेस्ट लावलेले तांदूळ घालून २ ते ३ मिनटे हलक्या हातानी परतावे. ५ ते ६  वाट्या पाणी घालून मोठ्या गास्य्वर ५ मिनिटे उकळू द्यावे. ग्यास बारीक करून त्यात मीठ, थोडेशी साखर, साजूक तूप आणि, मनुके घालून झाकण ठेऊन भात शिजू द्यावा. झाकणावर थोडे पाणी असू द्यावे लागल्यास हेच वरचे पाणी गरज भासल्यास भातात घालता येईल. भात पूर्ण शिजल्यावर वरून तळलेला कांदा आणि काजू घालावे आणि वाढताना वरून कोथिबिर घालावी.

टीप: १. भात जरका खाली लागत आहे असे वाटल्यास पातेल्याच्याखाली तवा ठेवावा. २. भात सारखा हलवू नये अथवा  तांदुळाचे तुकडे पडतात. ३. पाण्याचे प्रमाण भात शिजण्यावर अवलंबून असते गरज भासल्यास भात अगदी कच्चा वाटल्यास पाणी उकळून लागेल तेवढेच घालावे. ३. भात पूर्ण शिजत आला असे वाटले किं ग्यास बंद करून झाकणावर शिजू द्यावा म्हणजे मोकळा होतो. ४. भात मोकळा होण्यासाठी त्यात शिजत आल्यावर वरून थोडेसे तूप सोडता येईल.

No comments:

Post a Comment